नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केरळ राज्यात मेंदू खाणाऱ्या अमीबाचे संक्रमण झालेला आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे राज्यात या गंभीर आजाराची लागण झालेली एकूण रुग्णसंख्या ४ झाली आहे. यापूर्वी अमीबा संक्रमणामुळे तीन अल्पवयीनांचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यात आढळणाऱ्या अमीबामुळे ‘अमीबिक मेनिगोएन्सेफलाइटिस’ नामक आजाराची लागण होत आहे.
उत्तर केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील पय्योली येथील आणखी एका १४ वर्षीय किशोरवयीन मुलाला अमीबाची लागण झाली असून, १ जुलैपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शनिवारी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. या मुलाची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याला अमीबाचे संक्रमण झाल्याचे समजल्याबरोबर विदेशातून औषधी आणून उपचार करण्यात आले. यापूर्वी बुधवारी रात्री ‘अमीबिक मेनिगोएन्सेफलाइटिस’च्या संक्रमणामुळे १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.