मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात कालपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीला सुरुवात झाली असून या दरम्यान जरांगे पाटलांनी सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ हे सरकारचे मुकादम आहेत. हे मुकादम मराठा- ओबीसीत भांडणे लावतात येवल्याच्या मुकादमाने सरकारच्या सांगण्यावरूनच सर्वांत भांडणे लावली असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच मराठा समाजाला त्रास देणाऱ्या मराठा नेत्यांनाही पाडा असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला शनिवारी हिंगोलीतून सुरुवात झाली. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
मनोज जरांगे यांनी विधानसभेवरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. ”आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले, तर सर्व जाती-धर्मातील उमेदवार देऊ, सर्व जाती धर्मातील उपमुख्यमंत्री करू. मला राजकारणात जायचं नाही माझा जन चळवळीवर विश्वास आहे. 288 निवडून द्यायचे की पाडायचे हे अजून ठरायचे आहे अजून 5 टप्पे दौऱ्याचे बाकी आहे. मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा”, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे यांनी आरोप केले आहेत. ”छगन भुजबळ हे मुकादम आहेत. तेच सर्व करत आहेत. कुणबी आणि मराठा एक आहे. त्यांनी बाकीच्या जाती पोट जाती म्हणून घातल्या आहेत. भुजबळ यांना सरकार सांगते म्हणून ते आम्हाला त्रास देत आहेत. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना आमचा विरोधक मानत नाही. हे जे काही घडविण्याचे काम सुरू आहे, त्यामागे भुजबळ आहेत”, असा आरोप जरांगे यांनी केला आहे.