ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुणे सत्ताबदलाचे केंद्र झाले पाहिजे ; वसंत मोरे ठाकरे गटात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसेनंतर आता वसंत मोरे यांनी वंचितलाही रामराम केले आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासह पुण्यातील मनसेचे तब्बल 23 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेसाठी मोठा धक्का असणार आहे. यावेळी बोलतांना हा माझा पक्षप्रवेश नसून मी स्वगृही परतलो आहे अशी प्रतिक्रिया मोरेंनी दिली.

यावेळी बोलतांना वसंत मोरे म्हणाले, ”1993 यामध्ये पहिल्यांदा शाखाप्रमुख झालो. बारावी पास झाल्यानंतर मी शाखाप्रमुख होतो. 16 व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो. माझा हा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेत आलो आहे. आम्ही सर्व मिळून पुण्यात एक ताकद उभी करू असे मी आश्वासन देतो. माझ्यासह अनेक पुण्यातील नेते स्वगृही परतले आहेत”, असे वसंत मोरे म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, ”वसंतराव काय करणार हे आम्ही पाहात होतो. ते पहिले शिवसैनिक होतात. शिवसेनेतून बाहेर गेल्यावर सन्मान मिळतो का हा अनुभव घेऊन तुम्ही स्वगृही परतले आहात. त्यामुळे तुमच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. आता त्यांची शिक्षा हीच की त्यांनी पुण्यात शिवसेनेची ताकद वाढवली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत जनतेने दिशा दाखवली. ती निवडणूक लोकशाहीसाठी होती. आता विधानसभेची लढाई ही राज्याच्या अस्मितेची असणार आहे. त्यात पुणे तर विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे पुणे सत्ताबदलाचे केंद्र झाले पाहिजे. मी अनेक दिवसांपासून पुण्यात आलो नाही. मात्र आता पुण्यातील शिवसैनिकांसाठी मी येणार आहे. पुणे आपल्याला भगवामय करायचे आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!