ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील लाडक्या बहिणींना वर्षाला मिळणार ३ सिलेंडरही मोफत

मुंबई : वृत्तसंस्था

महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्याबासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर देखील मोफत देण्यात येणार आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत आज शासन निर्णय निर्गमित झाला असून राज्यातील गोर गरीब कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या या शासन निर्णयामुळे राज्यातील गोरगरीब कुटुंबांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेमार्फत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” या नावाने राबविण्यात येणार आहे.

सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेस पात्र असणार आहे. एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार असून सदर लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!