ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात ठरलं : यापुढे मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील तेच होणार !

सोलापूरातील शांतता रॅलीसाठी अक्कलकोटमध्ये बैठक

अक्कलकोट  : प्रतिनिधी

ही लढाई कोणाच्या विरुद्ध नाही.ही लढाई फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि तीही ओबीसीतूनच. आता नाही तर कधीच नाही ही भूमिका प्रत्येक मराठा समाज बांधवांनी ठेवली पाहिजे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी समाजाने पेटून उठले पाहिजे,सोलापूरमधील शांतता रॅली ऐतिहासिक झाली पाहिजे त्या दृष्टीने मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावावी,असे आवाहन जिल्हा समन्वयक माऊली पवार यांनी केले.येत्या ७ ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सोलापूरमधून सुरू करत आहेत त्या अनुषंगाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच्या तयारीच्यादृष्टीने अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात अखंड सकल मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली.

या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.बैठकीला स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, जिल्हा समितीचे प्रा.गणेश देशमुख,शिवाजी चापले,महेश पवार,बाळासाहेब मोरे,मनोज निकम,अरुण जाधव,ऍड.सुरेश सूर्यवंशी, बाबा निंबाळकर,तम्मा शेळके,मोहन चव्हाण,अतुल जाधव,वरुण शेळके, सुभाष गडसिंग,अमर पाटील,वर्षा चव्हाण,आतिश पवार,शितल जाधव,योगेश पवार,प्रवीण देशमुख,नितीन मोरे,आणासाहेब सुरवसे, विश्वजित बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी सर्जेराव जाधव सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत बैठकीला सुरुवात करण्यात आली.

बैठकीत प्रारंभी तालुक्यातील मराठा समाजातील विविध नेते मंडळी आणि समाज बांधवांनी मनोगते व्यक्त केली.पुढे बोलताना माऊली पवार म्हणाले, येत्या ७ तारखेला जी रॅली होणार आहे ती रॅली पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हा.ही रॅली ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या समितीकडून प्रयत्न सुरू आहेत आणि या पुढच्या काळात मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील तेच होणार आहे.मनोज जरांगे पाटील हाच आमचा पक्ष ही भूमिका प्रत्येक मराठा बांधवांनी ठेवली पाहिजे,असे विचार त्यांनी मांडले.चापले म्हणाले,अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पार्किंगची व्यवस्था होम मैदानावर केली आहे.

या ठिकाणी अल्पोपहार आणि पाणी बॉटलची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रा. देशमुख म्हणाले,मनोज जरांगे पाटील हा पक्ष आहे.काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवत आहेत अशावेळी जरांगे पाटील यांना एकटे पडू देऊ नका.आपल्यासाठी ते गेले अनेक दिवस आमरण उपोषण करत आहेत.स्वतःचा जीव धोक्यात घालून आरक्षणासाठी लढा देत आहेत.त्यांच्या विरोधी सुरू असलेले कारस्थान हाणून पाडा.महेश पवार म्हणाले,हा लढा गेल्या पन्नास वर्षापासूनचा लढा आहे आम्हाला ५०
टक्केच्या आतील ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय सोडणार नाही.या रॅलीमध्ये प्रत्येकांनी पांढरे कपडे परिधान करावे.पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे.
व्यावसायिक वाहने असतील तर ते त्या दिवशी काढावे आणि गर्दी जमवावी.रॅली ऐतिहासिक व्हावी.यावेळी दहिटणेचे सहदेव पाटील एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अखंड सकल मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर आभार शाम सुरवसे यांनी मानले.

 

समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलकोट येथे कार्यालय

अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील मराठा समाज बांधवांचे प्रशासकीय स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.त्यासाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचे सहकार्य मिळणार असून त्याचे प्रमुख हे मनोज निकम असणार आहेत.या कार्यालयाची घोषणाही आज झालेल्या बैठकीतून करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!