ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचा प्लान : निवडणूक रणनीतीसाठी ठेवली गुप्त बैठक

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणूक किमान ४ महिने लांबणीवर पडल्याने २९ अाॅगस्टला अांतरवाली सराटीत होणारी नियोजित बैठक स्थगित करण्यात अाल्याची घोषणा मराठा अारक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी बुधवारी केली. मराठा समाजाची निवडणूक रणनीती सरकारला कळू नये म्हणून ही बैठक आता निवडणुका जाहीर होण्यापूर्वी घेतली जाईल, असे जरांगे पाटलांनी सांगितले. तूर्तास इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघाचा डेटा स्वीकारण्यासाठी २४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

२९ ऑगस्टच्या बैठकीत जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु निवडणुकीस अद्याप चार महिन्यांचा कालावधी असल्याचे सांगत त्यांनी ही बैठक स्थगित केली आहे. ते म्हणाले की, सरकारने दोन दिवसांत नवीन डाव टाकला. निवडणुकाच डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, अशीही परिस्थिती आहे. मराठा समाज उमेदवार ठरवण्यासाठी काय भूमिका घेतो याकडे सरकारचे लक्ष आहे आणि सरकार काय करते याकडे आमचेही लक्ष आहे. सरकारनेच निवडणुका लांबवल्याने मराठा समाजालाही २९ ऑगस्ट रोजी होणारी बैठक पुढे ढकलावी लागत आहे. विधानसभेला मराठा समाजाच्या प्रत्येक हालचालीवर सरकारची मंडळी लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यापासून मराठा समाजाची रणनीती गुप्त ठेवावी लागेल. आता निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे जरांगे पाटलांनी सांगितले.

मराठा समाजाची २९ ऑगस्ट रोजी होणारी बैठक होणार नाही. निवडणुकीत लढायचे किंवा कसे याचा निर्णय दीड-दोन महिन्यांनंतर घेऊ. तोपर्यंत इच्छुकांच्या अर्जांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करू. सरकारवर शेतकऱ्यांचा सर्वात मोठा रोष आहे तेही लक्षात घेतले पाहिजे. तोपर्यंत प्रत्येक गावात ज्यांना कुणबी नोंदी सापडल्या आहेत, पण प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत त्यांनी तहसीलदारांकडे जाऊन जाब विचारावा, असे जरांगे पाटील म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लागली तर प्रशासक म्हणून तेच बसणार आहेत. इच्छुक उमेदवार त्यांच्याकडे गेले असते. आपली निवडणुकीची रणनीती उघड करण्याचा त्यांचा डाव होता. त्यांना बहुतेक आंदोलकांची रणनीती उघड करायची होती म्हणून त्यांनी हा डाव टाकला. आताच आपण आपली रणनीती उघड करायला नको. निवडणुका पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण नव्हते. सरकार मराठा आंदोलनापुढे हतबल झाले आहे त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली. मी अद्यापही संयमी आहे. मराठे जर भूमिकेवर उतरले तर सरकारला पळता भुई थोडी होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!