नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन दिवसापासून तुफान पाऊस सुरु असून यंदाच्या पावसामुळे धरणसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून गंगापूर धरण ९१.५८, दारणा ९६.६८, मुकणे ७०.०९ ही महत्त्वाची धरणे भरल्यामुळे पाणी साेडण्यात येत आहे. रविवारी दिवसभर गंगापूरमधून ८४२८ क्युसेकने विसर्ग सुरू हाेता, तर नांदूर मधमेश्वरमधून ५२ हजार ३०८ क्युसेकने पाणी जायकवाडीकडे साेडण्यात आले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला ४ महिने पुरेल एवढा एकूण ५८.१४ टीएमसी साठा जायकवाडीत झाला आहे. रविवार सकाळपर्यंत २८.५२ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने साेडण्यात आले आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि विदर्भ तसेच घाटमाथ्यावर आणि मैदानी भागातही येत्या ४८ तासात मध्यम ते जाेरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. विदर्भात पुढील चार दिवस नागपूर वेधशाळेने यलाे अलर्ट जाहीर केला आहे. रविवारी राज्यात सर्वाधिक ८७ मिलिमीटर पावसाची नोंद डहाणू येथे झाली. गेल्या ३ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात ठिकठिकाणी संततधार सुरू असल्याने गंगापूर, दारणा, पालखेड धरणातून पूर पाणी सोडण्यात येत आहे.