मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असतांना नुकतेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढली आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश भागात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यातील विदर्भ, मराठवाडा आदी भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकटांसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये तीन ते पाच सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याची वाटचाल आता भारताच्या दिशेने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील विदर्भ, आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अधून मधून पावसाच्या हालक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात जवळपास सर्वच भागात अधून मधून हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच किनारपट्टीवर देखील पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज देखील हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.