मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण देणार यावर मोठी चर्चा सुरु असतांना शरद पवार व काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याचे ठणकावून सांगितल्यानंतर ठाकरे गटाने यासंबंधीचा आपला हट्ट सोडला आहे. ठाकरे गटाने आता या प्रकरणी मवाळ भूमिका घेत राज्यातील भ्रष्ट सरकार हटवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेस व शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले होते. मविआने विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा. काँग्रेस व शरद पवार गटाने मुख्यमंत्रीपदाचा आपला उमेदवार घोषित करावा. हवे तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले होते. पण शरद पवार यांनी बुधवारी कोल्हापुरात बोलताना त्यांची ही मागणी धुडकावून लावली होती.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर विचार करण्याचे तूर्त कोणतेही कारण नाही. नेतृत्व कुणी करायचे हा निर्णय निवडणूक झाल्यानंतर संख्याबळानुसार घेता येईल. तूर्त लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे. हे आमचे प्रथम उद्दिष्ट्य आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
शरद पवारांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याचे जोरदार समर्थन केले. शरद पवार काहीही चुकीचे बोलले नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातच आम्ही या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर चर्चा केली. त्यामुळे या प्रकरणी वेगळा अर्थ काढण्याचा प्रश्न नाही, असे ते म्हणाले.