ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ; जरांगे पाटील

बीड : वृत्तसंस्था

मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून अविरत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. शुक्रवारी माजलगाव विधानसभा मतदार संघातील तेलगाव ता.धारूर येथे दुसर्‍या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित हजारो समाज बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजास ओबीसीतमधून आरक्षण मिळावे. यासाठी गेल्या वर्षेभरापासुन आपण लढत असून, सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकत्रित आला असून, यातून मराठ्यांनी आपली एकजुट दाखवून दिली आहे. आपल्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपली एकजुट अशीच कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जरांगे पाटील पुढे म्हणाले कि, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार राजेंद्र राऊतांच्या माध्यमातुन मराठ्यांमध्ये फुट पाडण्याची खेळी करत आहेत, असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांची ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजास आरक्षण दिले तर आम्ही राजकारण करणार नाही. पण जर आरक्षण दिले नाही तर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी तेलगाव येथे आयोजित घोंगडी बैठकीत बोलताना दिला. भर पावसात झालेल्या या बैठकीस सभेचे रूप आले होते.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला राजकारणाची अथवा निवडणुकीची लालसा नाही. मला फक्त माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्याच्या लेकरांना आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठीच माझा लढा असल्याचे जरांगे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजात फुट पाडण्याची खेळी खेळत आहेत. मात्र मराठा समाज त्यांची ही खेळी ओळखून आहे. आमदार राऊत यांनी ही आपली पोपटपंची जास्त करू नये, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, राउतांचा समाचार घेण्यासाठी व त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण लवकरच बार्शीत सभा घेणार आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने सावध भूमिका घेत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या मागेपुढे करू नका. आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार करा. जो आपल्याला आरक्षण देईल, तोच आपला. हे लक्षात ठेवा असे जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!