नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील मोठ्या शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतला घटना घडून गेल्यावर १२ तासांनी ताब्यात घेतले, अशी कबुली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. शिंदेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बर्डी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकारे, पोलीस उपायुक्त राहूल मदने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यातील एका उत्तरात त्यांनी ही कबुली दिली.
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच यातही संकेतला निबंध लिहायला लावून सोडून देणार का, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा संकेतवर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा कायदेशीर लढाई लढावी लागेल, असा इशारा अंधारे यांनी नागपूर पोलिसांना दिला. तत्पूर्वी त्यांनी ऑडी अपघाताचा घटनाक्रम समजावून घेतला. त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिस प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला.
अंधारे म्हणाल्या की, प्रारंभी संकेत गाडीत नव्हते असे भासवण्यात आले. नंतर ते गाडीत असल्याचे सांगण्यात अाले. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी संकेत बावनकुळे गाडीत मागे बसलेला होता असे सांगितले. तर पोलिसांनी तो ड्रायव्हरच्या बाजूला बसल्याचे सांगितले. नागपुरात ३५०० सीसीटिव्ही आहे. गाडीने प्रवास केला त्या ठिकाणचे फुटेज तपासले का, अशा प्रश्नांची सरबत्ती अंधारेंनी पोलिसांवर केली. संकेत बावनकुळेंचे मेडिकल का नाही केले, यावर पोलिसांनी घटनेनंतर संकेत तिथून पळून गेला होता असे सांगितले.