मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई मंत्रालयाबाहेर दिव्यांग कल्याण मंत्रालय प्रमुख प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांनी आकाशवाणी आमदार निवासस्थानाचा ताबा घेतला. या इमारतीच्या टेरेसवर हे आंदोलक पोहोचले आहेत. त्यामुळे आता या परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, दिव्यांगांना घरकुल देण्यात यावे, दिव्यांगांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना व्यवसायासाठी गाळा आणि जागा मिळालीच पाहिजे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यभरातून आलेल्या दिव्यांगांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
दिव्यांग कल्याण मंत्रालय प्रमुख प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजता आंदोलकांनी मंत्रालयासमोर पोहोचण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र, आंदोलक आधीच या परिसरात दाखल झाले. त्यांनी थेट येथील आमदार निवासामध्ये घुसत त्याचा ताबा घेतला. नंतर हे आंदोलक टेरेसवर दाखल झाले आणि आंदोलन सुरु केले. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.