मुंबई : वृत्तसंस्था
दसरा सनाच्या दिवशी मुंबईतील वांद्रे भागात माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हत्येनंतर आता मुंबईत दहशतीचं वातावरण आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले. मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. दिवस फार थोडे राहिले आहे. दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. निवडणुकीची प्रक्रिया संपल्याशिवाय यांना उत्तर मिळणार नाही. लोकांसमोर जाणं आणि लोकांची सुटका करायची आहे. सत्तेत परिवर्तन करणं हाच पर्याय आहे. त्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असं शरद पवार म्हणालेत.