अक्कलकोट वृत्तसंस्था
विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी कन्या तथा काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष शितल म्हेत्रे यांनी मतदार संघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. बापासाठी लेकीची धडपड सुरू असून शितल म्हेत्रे या ग्रामीण भागात जाऊन प्रचार करत असल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून प्रचार सुरू आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे प्रचारासाठी अहोरात्र झटत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते मंडळी कार्यकर्ते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी झटत आहेत. या प्रचाराच्या मैदानात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या तथा काँग्रेस पक्ष महिला आघाडी अक्कलकोट तालुका अध्यक्ष शितल म्हेत्रे उतरले आहेत. शितल म्हेत्रे यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील भागावर लक्ष केंद्रित केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग होटगी, बोरामणी ,कुंभारी या गटातील विविध गावात शितल म्हेत्रे यांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. विविध गावात जाऊन पदयात्रा काढून मतदारांना भेटून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना मतदान करण्याचे आवाहन शितल म्हेत्रे करत आहेत.
शितल म्हेत्रे यांच्या प्रचार दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षातील महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह वाढला आहे. बोरामणी भागाचे पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे हेही त्यांच्यासोबत मतदार संघ पिंजून काढत आहेत. शितल म्हेत्रे यांच्या या प्रचाराची चर्चा मात्र मतदारसंघात रंगली आहे. त्यांनी केलेल्या होम टू होम प्रचाराला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.