मुंबई वृत्तसंस्था
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एसटीएफ आणि मुंबई पोलिसांनी रविवारी बहराइचमधील नानपारा भागातून मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ शिवाला अटक केली.
या अटकेसोबतच पोलिसांनी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या शिवाच्या अन्य चार साथीदारांनाही अटक केली. शिवकुमारने पोलिसांच्या चौकशीत हत्येच्या कटाचा संपूर्ण खुलासा केला. त्यानेच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. घटनेनंतर त्याने पिस्तुल फेकून पळ काढला. मात्र अन्य दोन शूटर्सना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. शिवकुमारच्या मागे दोन मुख्य हस्तक होते. शुभम लोणकर आणि मोहम्मद यासीन अख्तर, जे महाराष्ट्र आणि जालंधरचे रहिवासी आहेत.
बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर आपल्याला 10 लाख रुपये मिळणार होते आणि दर महिन्याला काही पैसे देण्याचे आश्वासनही दिले होते. एवढ्या मोठ्या रकमेच्या लोभापोटीच त्याने ही भयानक घटना घडवली. हत्येनंतर, त्याला आणि त्याच्या शूटर साथीदारांना जालंधरहून कटरा (जम्मू) येथे पोहोचण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु पोलिसांनी दोन शूटरना अटक केल्यामुळे ही योजना फसली. घटनेनंतर त्याने मुंबईहून पुण्याचा, नंतर झाशी आणि लखनौमार्गे बहराइचला जाण्याचा मार्ग स्वीकारला. तो वाटेत त्याच्या साथीदारांशी आणि हँडलरशी बोलला आणि त्यांना सांगितले की त्याला नेपाळमध्ये आश्रय देण्यात आला आहे. तो नेपाळला पळून जाण्याचा विचार करत होता, असे शिव कुमारने संगीतले.
पण पोलिसांच्या तावडीत आला. याबाबत माहिती मिळताच एसटीएफने संयुक्त कारवाई करत बहराइचमधून शिवकुमार आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींकडून कपडे आणि मोबाईल फोन अशा काही वस्तू जप्त केल्या आहेत. पाचही आरोपींना आता नानपारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले असून त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला पाठवण्याची तयारी सुरू आहे. या अटकेमुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तर उघड झाला आहेच, शिवाय या हत्येमागील कटाचे खोल नेटवर्क आणि काही भागही उघड झाले आहेत.