मुंबई वृत्तसंस्था
आज सर्व मतदारासंघाचे निकाल समोर आले असून महायुतीने 200 हून अधिक जागांवर विजय मिळवल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 50 चा आकडाही पार करता आलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून महायुतीवर टीका होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली.
आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय असा हा निकाल आहे. पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे. निकाल कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक निकालावर नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, लाटेपेक्षा त्युसामीच आली असं वातावरण या निकालातून दिसत आहे. पण हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटला आहे की नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जे आकडे दिसत आहेत, ते बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बील मंजूरीसाठी मांडण्याची गरजच नाही, असे चित्र आहे. थोडक्यात विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही असा त्यांचा प्रयत्न आहे. दीड वर्षांपूर्वी भाजपाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जेपी नड्डा बोलले होते, एकच पक्ष राहील. याचा अर्थ वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने त्यांची आगेकूच चालली आहे की काय? असं भीतीदायक चित्र आहे. एकूणच हा निकाल बारकाईने पाहिला तर लोकांनी महायुतीला का दिली? असा प्रश्न उपस्थित होतो.
सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाची खरेदी होत नाही, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेलेत आणि महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडली म्हणून लोकांनी त्यांना मतं दिली का? कारण प्रेमापोटी हा शब्द बोलणं चुकीचं आहे. पण रागापोटी अशी ही लाट जणू काही उसळली आहे, हे कळतच नाही. त्यामुळे हा निकाल अनाकलनीय आहे. या मागचं गुपीत काही दिवसांमध्ये शोधावं लागेल. तूर्तास मी महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगेन की, आपण निराश होऊ नका, खच्चून जाऊ नका. काही जण म्हणतात की, हा ईव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो. पण महाराष्ट्रातल्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर कोणीच काही बोलण्याची गरज नाही. पण जनतेला मान्य नसेल तर त्यांना एवढंच सांगेन की, आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू. कोणी काहीही म्हटले तरी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.