ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार ?

शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई वृत्तसंस्था 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे.  जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सादर केली आणि ही योजना तातडीने लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते (७,५०० रुपये) पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला २,१०० रुपये दिले जातील. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे. तसेच, आगामी हप्त्याद्वारे १५०० रुपये दिले जाणार की २१०० रुपये असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, “ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता २१०० रुपये होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती झाली आहे”.

शिंदे म्हणालेकी, शिवसेनेच्या (शिंदे) गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या व काही सामान्य महिलांशी बातचीत केली. यावेळी महिलांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येणार? त्यावेळी मी त्यांना म्हणायचो, आम्हाला बहुमत मिळेल. परंतु, तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल. परंतु, तुम्ही तर विरोधकांना डम्पिंग मध्ये टाकलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!