---Advertisement---

ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार ? आमदारांची धाकधूक वाढली

By team
On: November 28, 2024 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आलीय. मात्र अद्यापही मुख्यमंत्री निश्चित झालेला नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजता ही बैठक होईल. अमित शाहांच्या भेटीसाठी अजित पवार सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस दुपारी साडेतीन वाजता दिल्लीकडे निघणार आहेत. तर एकनाथ शिंदे दुपारी 4 वाजता दिल्लीला रवाना होतील. या भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता आहे. याचदरम्यान नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होत तरुण चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.

दिल्लीतील बैठकीत आज मुख्यमंत्रिपदाबाबत निश्चिती झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या नावांवर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे आज सकाळपासून सागर बंगल्यावर आमदारांची रिघ पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देखील महायुतीमधील अनेक आमदार सागर बंगल्यावर दाखल झाले होते. अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात युवा आमदारांना जास्त संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी आतापासून तयारी केली जाणार आहे. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांचा धाकधूक वाढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!