मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा तर लागला पण अजूनही मुख्यमंत्री कोण याबाबत तिढा काही सुटताना दिसत नाहीय. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आज शुक्रवारी वर्षा निवासस्थानी गेले. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिंदेच्या भेटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त आमदार जितेंद्र आव्हाड पोहोचले होते. या आधी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.
अजित पवार अर्थमंत्री असताना अनेकदा मागणी करूनही त्यांनी आपल्याला निधी दिला नव्हता अशी तक्रार या आधी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाजूलाच राहतात त्यामुळे त्यांनी आपल्याला अनेकदा मदत केली होती असेही त्यांनी सांगितले होते. आताही महायुती सरकारमध्ये अर्थमंत्रिपद हे अजित पवारांकडे जाणार हे निश्चित झाले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्यालाही महत्त्वाची खाती येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.