सोलापूर, वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होताच सोलापूर – माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये नाट्य रंगले आहे. ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत गावकऱ्यांनी मारकडवाडीत मतदानाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज (दि.3) या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदार घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता आमदार उत्तम जानकरांनी स्वतः हे मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे.
मारकडवाडीत बॅलेट पेपरवरील मतदान घेण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.जमाबंदीच्या आदेश असल्याने आणि प्रशासनाचा दबाव असल्याने आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू असे जानकरांनी म्हटले आहे. तसेच शालेय मुलांचे आणि इतर कोणाचाही नुकसान होऊ नये गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय घेतल्याचे जानकरांनी म्हटले आहे.
मतदान प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा करताना जानकरांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मारकडवाडीतील गावकऱ्यांनी आज बॅलेटपेपवरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिस प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान करण्यास परवानगी दिली नाही. मतदानासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती पण मतदान करण्यासाठी येणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून दबाव येत असल्यामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे आरोप जानकरांनी केले आहेत.
एकीकडे जानकरांनी बॅलेट पेपरवरील मतदान रद्द करण्याची घोषणा केली असली तरी, घडलेल्या प्रकाराबाबत आपण येत्या पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे उत्तम जानकर महाराष्ट्रला देणार असल्याचे जानकरांनी म्हटले आहे. त्यामुळे आता जानकर नेकमे कोणते पुरावे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे मारकडवाडी येथे नाट्यमय घडामोडी घडत असताना भाजप नेते राम सातपुते यांनी ट्विट करत मोठा बॉम्ब फोडला होता. यात सातपुते यांनी जानकर हे या नाट्याचे केवळ प्यादे असून, या सर्वांचा मास्टरमाईंड रणजीतसिंह मोहिते पाटील हे आहेत. याबाबत सातपुते यांनी एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.