ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुतीच्या 6 आमदारांचं विधानपरिषदेचं सदस्यत्व रद्द

मुंबई वृत्तसंस्था 

महायुतीच्या सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र प्रतिबंध गंभीर कारणांमुळे घालण्यात आलेले नसून सहाही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले. तर भाजपचे गोपीचंद पडखळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली. शिंदे गटाचे आमश्या पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. तसेच भाजपचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत रमेश कराड यांनी विजय मिळवला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्यासाठी तीन मोठमोठे स्टेज उभारण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे भगव्या रंगाचा वापर इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आजच्या शपथविधी कार्यक्रमात तीन जण शपथ घेणार असून यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!