बीड वृत्तसंस्था
बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन हत्या केल्यानंतर काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर काल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी खंडनीच्या प्रकरणातून हा प्रकार झाल्याचं म्हटलं असून, यांच्या माज मस्तीमुळे आमच्या मराठा समाजातला हिरा गेला असं जरांगे म्हटले.
जातीयवादाचे प्रयोग करुन, विष करुन, खून करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न थांबवा. अन्यथा समाजाला उठावं लागेल आणि तुम्हाला जो दिवस बघायची नाही, तो तुम्हाला बघायची वेळ येईल असं म्हणत मनोज जरांगे यांनी नव्यानं निवडून आलेल्या नेत्यांना इशारा दिला आहे. तुम्हाला खून हा विषय कळत नसेल, तर तुम्हाला जड जाईल. तुम्हाला जे वाटतंय, त्याच्या पलीकडे हा विषय जाईल. संयम सुटला तर कठीण होईल. आरोपीला पाठीशी घालू नका, त्यात जात आणू नका, तुम्ही जातीयवादी नाहीत हे सिद्ध करा. एकदा गोष्ट हातातून सुटली तर सुटेल… आमचं काळीज जळालं, आम्ही हे दु:ख पचवतोय असं मनोज जरांगे म्हणाले.
आपल्या भावाचे पोस्टमार्टम करुन आपण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करु असं म्हणत मनोज जरांगे यांनी आक्रमक जमावाला शांततेचं आवाहन केलं असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. मृत संतोष देशमुख यांच्या भावाच्या जिवालाही धोका असून, त्यांच्यासाठीही सुरक्षारक्षक नेमल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
आम्हाला प्रशासनाने जो शब्द दिलाय, तो जर पाळला नाही, तर आम्ही आरोपीला शिक्षा होईपर्यंत लढणार असं जरांगे म्हणाले. तुमच्या आज्याची, बापांची चालत होती, पण ते दिवस आता गेलेत. सहन करायचे दिवस आता संपलेत, आम्ही नवे पोरं आहोत, आम्हाला सहन होणार नाही. आम्हाला त्या मार्गावर यायला लावू नका, जातीवाद बंद करा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.