रेल्वे ट्रॅकवर मृत्यू तांडवाने जळगाव जिल्हा हादरला : १३ जणांचा मृत्यू
१५ हून अधिक जखमी, ४ गंभीर : छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा रेल्वे रुळांवर रक्ताचा सडा
जळगाव : वृत्तसंस्था
जळगावाच्या परधाडे रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. अफवा पसरताच प्रवासी ट्रॅकवर उतरले. त्यानंतर दुसऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडले आणि रेल्वे ट्रॅकवर मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. या भीषण अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाकडून उच्चस्थरीय चौकशी केली जाणार आहे.
रेल्वेचे अधिकारी दिलीप कुमार यांनी सांगितलं की, ‘पुष्पक एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी अलार्म चेन खेचली. त्यानंतर लोक ट्रेनमधून उतरले. दुसरीकडे बेंगळुरू-नवी दिल्ली-कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. या ट्रेनखाली चिरडल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. भुसावळचे अनेक लोक ट्रेनमध्ये शिरले होते. त्यांनी अलार्म चैन खेचली. त्यानंतर लोक चुकीच्या ट्रॅकवर उतरले. त्यानंतर सर्व प्रवासी ट्रॅकवर उभे होते. त्याचदरम्यान भरधाव ट्रेनने प्रवाशांना चिरडले. या अपघाताच्या घटनेनंतर वैद्यकीय टीम देखील घटनास्थळी पोहोचली. तसेच अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनास्थळी भेट देत माहित घेतली. पाचोरा रेल्वे स्थानकापासून जवळ ही घटना घडली. पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ४.२० वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या होत्या. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
चाकांमधून ठिगण्या उडाल्याने आगीची अफवा
काल दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. एक्सप्रेसच्या चाकांमधून ठिगण्या उडाल्यानेच आगीची अफवा पसरली आणि लोकांनी गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे ही दुर्घटना घडली. आता एक्सप्रेस सुरू झाली आहे. मी पाचोऱ्याच्या पुढे आलो आहे, असं संदीप जाधव यांनी सांगितलं. पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्यानंतर जखमी प्रवाशांना जळगाव रेल्वे स्थानकाकडे नेण्यात आलं आहे. काही प्रवाशांना पाचोरा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. सात ते आठ प्रवाशी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक्सवर (ट्वीटर) पोस्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार
जळगावजवळ पाचोरा येथे पुष्पक एक्स्प्रेस मधील प्रवाशांनी भीतीने गाडीतून उड्या मारल्याने समोरून येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने भीषण अपघात झाला झाल्याची दुर्दैवी घटना मन सुन्न करणारी आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी प्रवाश्यांना उपचारासाठी आवश्यक सर्व सुविधा सरकारने तातडीने उपलब्ध करून द्यावे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलावी असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे..
‘जळगावातील पुष्पक एक्स्प्रेसची दुर्घटना मनाला हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत कुणी अफवा पसरवली असेल, त्याची रेल्वे मंत्रालयाकडून निश्चित उच्चस्तरीय चौकशी होईलच. पण सध्या राज्य सरकार यासंदर्भात तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य करतंय. जखमींना तात्काळ उपचार देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असले, तरी या दुर्घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांवर ओढवलेल्या या दुःखात महायुती सरकार त्यांच्यासोबत आहे’