मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सूत्रांचा दाखला देत बातमी देणाऱ्या माध्यमांवर चांगलेच भडकले. या सूत्रांना जीवनगौरव दिला पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणतेही विधान केले नाही. त्यानंतरही तशी बातमी चालवण्यात आली. हा माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणालेत.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी केव्हाच केला नाही, असे विधान अजित पवारांनी केल्याचा दावा नुकताच काही माध्यमांनी केला होता. त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उपरोक्त विधान केले आहे.
अजित पवार शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध अशा आशयाची बातमी चालवली. त्यांनी आपण काय बातमी देत आहोत याचा थोडासा विचार करावा. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे केव्हाच म्हणालो नाही. मी स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण धादांत खोट्या बातम्या देऊन माझी बातमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली. या प्रकरणी काही बोलायचे असेल तर मी स्वतः बोलेन. तरीही प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात? या सूत्रांना जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे.
अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या संसर्गावरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्य सरकार व आरोग्य विभाग या प्रकरणी बारीक लक्ष ठेवून आहे. या आजाराच्या उपचारासाठी जास्त खर्च येत आहे. आर्थिक बाबी सांभाळायचे काम सरकारकडे आहे. मी सोमवारी यासंबंधी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहे.