ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…पण ते मतदान कुठेतरी गायब झाले ; राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश तर महाविकास आघाडीसह मनसेला मोठा धक्का बसला होता त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या. त्यांनी आकडेवारीचा आधार घेत निवडणुकीत घडलेल्या काही घटनांकडे लक्ष वेधले आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभेच्या निकालानंतर राज्यात कुठेच उत्साह नव्हता, उलट सन्नाटा पसरलेला दिसत होता, असे सांगितले. त्यांनी असे नमूद केले की, “लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केले, पण ते मतदान कुठेतरी गायब झाले.” त्यांनी मतदारसंघातील काही उदाहरणे देत निकालाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. ईव्हीएमवर शंका घेताना राज ठाकरे म्हणाले, “१४०० लोकसंख्या असलेल्या गावात आमच्या उमेदवाराला एकही मत मिळाले नाही. याआधीच्या निवडणुकीत त्यांना भरघोस मतदान झाले होते, मग अचानक असे कसे झाले?” अशा प्रकारच्या आकडेवारीवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे उदाहरण देत सांगितले की, “७० ते ८० हजार मतांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात १० हजार मतांनी हरतात, हे कोणत्या गणिताने शक्य आहे?” तसेच, “भाजपाला १३२ जागा मिळाल्या, अजित पवारांना ४२ जागा मिळाल्या, तर शरद पवार यांच्या गटाला फक्त १० जागा मिळाल्या. लोकसभेला सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले, पण विधानसभेला त्यांच्या जागा मात्र अत्यल्प आल्या. तीन महिन्यांत लोकांचे मत कसे काय इतके बदलले?” असा सवालही त्यांनी केला.

आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, “या निकालाने खचून जाण्याची गरज नाही. लोकांनी आपल्याला मतदान केले, पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही. अशी निवडणूक लढवायची असेल, तर ती न लढवलेलीच बरी.” त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाने आतापर्यंत केलेल्या आंदोलनांची आणि मिळवलेल्या यशाची सतत आठवण जनतेला करून द्यावी, असेही सांगितले. “आपण काय केले याचा प्रचार करताना ठाम राहा, भांबावून जाऊ नका,” असा सल्लाही त्यांनी दिला. मनसेने विधानसभेच्या १२० हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल काय भूमिका घेतली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!