मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीमध्ये असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत निवडणुकीनंतर देखील मोठे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता पुन्हा एकदा कॉंग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. नुकतेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसैन दलवाई यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता यामुळे वर्तवली जात आहे. याबरोबरच उद्धव ठाकरे गटाचे काही माजी आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माध्यमातून शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी या आधी देखील राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबविले जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश देखील केला. तर काही माजी खासदार आणि आमदार देखील आपल्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता. त्यानुसार आता लवकरच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्याची तयारी एकनाथ शिंदे करत असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वात पाच माजी आमदारांचा शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे यांच्या बैठकीमध्ये नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटे हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. मोकाटे हे कोथरूडचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर हडपसर येथील माजी आमदार महादेव बाबर, रत्नागिरीचे माजी आमदार गणपत कदम आणि संगमेश्वर येथील माजी आमदार सुभाष बने यांचा नावाचा देखील यात समावेश असल्याचा दावा केला जातोय.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे पक्ष मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला विधानसभा निवडणुकीप्रमाणेच चांगले यश मिळवून देण्याचा प्रयत्न आता शिवसेना करत आहे. त्या दृष्टिकोनातून पक्षात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये माजी नगरसेवकांसह माजी आमदार आणि माजी खासदारांचा देखील समावेश असू शकतो.
आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. इतकेच नाही तर काही जनतेची कामे असतात, त्यासाठी आपण अजित पवार यांचीही भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, त्यांनी ते काम करण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.