ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी दुर्घटना टळली : तपोवन एक्सप्रेसच्या समोरच ट्रक लावला आडवा !

जालना : वृत्तसंस्था

देशभरात रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असतांना एक खळबळजनक घटना राज्यातील जालना येथून समोर आली आहे. मुंबईकडून नांदेडला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या समोरच ट्रक आडवा लावण्यात आल्याची घटना जालना येथे घडली आहे. लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ट्रक चालकाने ट्रक थेट रेल्वे रुळावर आडवी लावत ट्रक तिथेच सोडून पळून गेल्याचे समजते. या आरोपी ट्रक चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

शुक्रवारी दुपारी 2.45 वाजता तपोवन एक्स्प्रेस जालन्याहुन नांदेडकडे जात होती. सारवाडी जवळ एका ट्रक चालकाने ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवर चढवला. ट्रक आणि धावत्या रेल्वेत पाचशे ते सातशे मीटरचे अंतर बाकी असतानाच अचानक रेल्वे चालकाने रेल्वे थांबवल्याने हा रेल्वे आणि ट्रकचा समोरा-समोर होणारा अपघात टळला. त्यानंतर जालना येथून रेल्वे पोलीस आणि रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या टीमने घटनास्थळी दाखल होत दुसऱ्या ट्रकच्या मदतीने हा ट्रेलर ओढून बाहेर काढला. यात जवळपास एक तास वेळ गेला त्यानंतर तपोवन एक्सप्रेस पुढे पाठवण्यात आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जळगाव येथे रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले होते. जळगावची ही घटना ताजी असतानाच जालना येथे अशी घटना घडली आहे. ट्रक चालकाने रेल्वे रुळावर ट्रक आडवा लावत पलायन केल्याने खळबळ उडाली. वेळीच लोको पायलटने रेल्वेचे ब्रेक दाबले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की ट्रक चालकाने ट्रक असा रेल्वे रुळावर आडवा उभा करत पलायन का केले? याचा तपास आता स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे. तसेच अज्ञात ट्रक चलकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेणे सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!