बीड : वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर झाला असल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच विष्णू चाटे याच्या मोबाईल मधील डाटा देखील सीआयडीने शोधला आहे. यामध्ये महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. इतकेच नाही तर या तपासात काही गोपनीयता पाळायची आहे. त्यामुळे ती माहिती दिली जात नसल्याचे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली. यादरम्यान धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील तपासाची संपूर्ण माहिती घेतली. या तपासा मध्ये अडचण ठरणाऱ्या गोष्टींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. मात्र सध्या तपास समाधानकारक सुरू असल्याचे मत यावेळी धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जात आहे. यासंदर्भात तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख यांनी केज येथील शासकीय विश्रामगृहात सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली. तपासाच्या अनुषंगाने या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडचण ठरत असतील त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी आमची विनंती असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांनी थेट भाष्य करणे टाळले आहे.