मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय योजनांना ब्रेक लावून त्यांना कॉर्नर केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया सोमवारी म्हणाल्या की, सोमनाथ सूर्यवंशी यांची कथितपणे दुर्दैवी हत्या झाली. यात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. त्याला माझे पूर्ण समर्थन आहे. केवळ निलंबन करून काय होणार? त्यांना घरबसल्या पगार मिळेल. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल. कामावर आल्यानंतर ते पुन्हा तसेच करतील. असे चालणार नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
भाजप आमदार सुरेश धस हे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण व बीड येथील संतोष देशमुख हत्याकांड या दोन्ही प्रकरणात दुटप्पीपणा दिसून येत आहे. संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य करताना ते सातपुडा बंगल्यात खंडणीचा 3 कोटींचा व्यवहार झाल्याचा दावा करतात. पण काल त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आपली नसल्याचे ते म्हणाले. सूर्यवंशी प्रकरणात एकीकडे ते लाँग मार्चमध्ये सहभागी होतात. पण त्याचवेळी ते पोलिसांवर कोणतेही गुन्हे दाखल न करण्याची विनंती करतात. ही टुटप्पी भूमिका भाजपच त्यांच्या तोंडून वदवून घेत असल्याचा संशय आहे.