सोलापुर : वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या विषयावर बोलताना वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यातून नव्हे तर लाच देऊन सुटले होते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच राहुल सोलापूरकरचे तोंड फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा, अशी घोषणाच ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे.
शरद कोळी म्हणाले, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा. राहुल सोलापूर जिथे दिसेल तिथे त्याचे तोंड चपलीने रंगवणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस मी जाहीर करत आहे, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.
राहुल सोलापूरकर काय म्हणाले होते? छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचे.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावे लागते. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते.
राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी देखील टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.