मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू केल्या त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काळात गरिबांच्या योजना बंद केल्या जात आहे, पण अदानींच्या योजना सुरू आहेत. केवळ गरीबांच्या योजना का बंद केल्या जात आहे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या काळातील योजना बंद करण्यात येत आहे, यावर एकनाथ शिंदेंनी आवाज उठवायला हवा असे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मंत्री होते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर लाडका भाऊ, आनंदाचा शिधा ह्या योजना बंद करताय यावर एकनाथ शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या काळात जेव्हा शिवभोजन थाळी ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा एकनाथ शिंदे मंत्री होते. त्या योजनेचे एकनाथ शिंदेंनी उद्घाटन केले आहे. गरिबांच्या योजना का बंद होतात हा प्रश्न सरकारमधील लोकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे.
संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांच्या पक्षाचे नेते तानाजी सावंत त्यांचा मुलगा पळून गेला की त्यांचे अपहरण झाले हे त्यांनीच सांगितले पाहिजे, मला याबद्दल काही माहिती नाही. महाराष्ट्रामध्ये खंडणी अपहरण आणि पलायन अशी प्रकरणे रोज घडत आहेत, यात काही नवे नाही. पण श्रीमंतांची मुले स्वतच्या विमानाने बँकॉकला पळून जातात आणि गारिबांची मुले बेरोजगारीला कंटाळून रेल्वे फलाटावरुन कुठेतरी निघून जात आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचा प्रश्न हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, त्यावर जास्त राजकीय चर्चा करु नये.
संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. पण फडणवीयांच्या सरकारला कुठलीही आस्था राहिलेली नाही. हमी भावाबद्दल त्यांच्याकडे काहीच योजना नाही, असे म्हणत त्यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असेल ते रिमार्क देत असतात पण त्यांची अंमलबजावणी करण्याचे औदार्य ना केंद्र सरकार दाखवतंय ना राज्य सरकार. हायकोर्टाला विचारतंय कोण असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.