ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील ‘या’ गावाने घातली कोल्ड्रिंक्सवर बंदी !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरासह ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांसह तरुण अनेक व्यसनाच्या आहारी जात असतांना कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स शरीराला हानीकारक असल्याचे माहित असूनही अनेकांकडून सेवन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने शाळा-कॉलेजमधील मुलांचा समावेश अधिक असतो. आरोग्यासाठी हानिकारक असले तरीही मुलं आवडीने कोल्ड्रिंक्स पितात. मात्र, आता महाराष्ट्रातील एका गावाने थेट या पेयांवर बंदी घालण्याचाच निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावामध्ये शीतपेयांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीने याबाबत निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णयाची राज्यभरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत पेडगाव ग्रामपंचायतीने त्या भागामध्ये कोल्ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या ठरावाला मंजूरी दिली आहे. ग्रामस्थांनी देखील या निर्णयाचे आवडीने स्वागत केले आहे.

पेडगावची लोकसंख्या जवळपास 8 हजार एवढी आहे. या गावात 3 शाळा असून, यामध्ये जवळपास 1 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात कोल्ड्रिंक्सचे सेवन केले जाते. याशिवाय, उन्हाच्या झळा वाढू लागल्याने शीतपेयाची मागणीही वाढत चालली आहे. मात्र, यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी गावातील एका विद्यार्थ्याचा एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे आता पेडगाव ग्रामपंचायतीने या पेयांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या ठरावामुळे आता गावात कोल्ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या कौतुकास्पद निर्णयाची राज्यभर चर्चा होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!