मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात असा इशारा फोनद्वारे दिला आहे. मोदी अमेरिकेला जात असलेल्या विमानात दहशतवादी बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या दूरध्वनीची दखल घेतली असून तातडीने दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा फोन मंगळवारी पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तीबाबत माहिती घेण्यात येत आहे. दूरध्वनी करणाऱ्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
गेल्या 4 महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे उघड झाले होते.
पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारी रोजी पॅरिसला पोहोचले होते. यावेळी त्यांनी बर्याच मोठ्या तांत्रिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर, त्यांनी 11 फेब्रुवारी रोजी पॅरिस येथे आयोजित कृती परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी अमेरिकेत पोहोचतील. त्यांचा 12 ते 14 फेब्रुवारी रोजई अमेरिकन दौरा असेल.