मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची छाननी सुरू केली असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाणार आहे. आतापर्यंत पाच लाख लाभार्थींना अपात्र ठरवत त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला इशारा देत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार, यासाठी आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुका-तालुका पातळीवर लढाई उभारणार असल्याचेही सांगितले.
महायुती सरकारने गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची अर्थसाहाय्य केले जात आहे. त्याचा महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाला. पण आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात अनेक महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे. विशेषतः इतर सरकारी योजनांतील लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी काटेकोट पडताळणीवर भर देत आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थींना वगळण्यात आले आहे.
आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले. लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा राहणार असल्याचेही ते म्हणाले. लाडक्या बहिणींनो आम्ही तुमच्या मागे आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला.
लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिला आहे, त्यामुळे एकदा दिले तर दिले, त्यांनी मते दिली आहेत, त्यामुळे बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का? असा खोचक टोला जयंत पाटील यांनी महायुती सरकारला लगावला आहे. लाडकी बहिणींसाठी पैसे बंद होणार नाही, यासाठी आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुका-तालुका पातळीवर लढाई उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.