मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये वाद निर्माण झाला असून त्याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली येथे महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्यातच आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
उदय सामंत म्हणाले, नक्की ही सदिच्छा भेटच होती. मी, नरेश म्हस्के, संजय नाहरजी, आम्ही शरद पवार यांना भेटलो. मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री आहे. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. मी मंत्री असल्याने आढावा घेण्यासाठी आलो होतो. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना भेटणे क्रमप्राप्त होते. त्यांच्याशी साहित्य संमेलनाबाबतची चर्चा झाली. ती चर्चा झाल्यावर आता आम्ही निघालो.
उदय सामंत पुढे म्हणाले, भेटले म्हटल्यावर चर्चा होणारच. साहित्य संमेलनाची चर्चा झाली. संमेलन यशस्वी झाले. सरकार म्हणून आम्ही सोबत आहेत. पण तुम्ही एवढे काही चालवत आहात त्यामुळे चर्चा तर होणारच ना. पण जी काही चर्चा झाली, पहिले आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू. नंतर तुम्हाला सांगू. आमचे नेते शिंदे आहेत. त्यांना भेटू. का भेटलो ते सांगणार आहोत, असे सूचक विधान उदय सामंत यांनी केले.
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, तुम्ही अर्थ कसाही लावू शकता. मला वाटते मी ज्या गोष्टी बघितल्या किंवा म्हस्केंनी जी चर्चा केली. काही गोष्टीत राजकीय निर्बंध पाळतो. रेल्वेबाबत चर्चा केली. 1200 साहित्यिक रेल्वेने प्रवास करणार आहे. रेल्वेत पहिले संमेलन 30 तास रेल्वेत होणार आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यावर चर्चा झाली. देशात पहिल्यांदा 30 तास रेल्वेत संमेलन होणार आहे. आम्ही साहेबांना कल्पना दिली की, तुमच्याकडे येताना आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मीडिया तिथे आहे. पण राजकीय चर्चा झाली नाही. नरेश म्हस्के यांच्या मतदारसंघातील प्रश्नावर चर्चा झाली. लोकसभेच्या कामकाजात कसा भाग घ्यावा यावर चर्चा केली.
उदय सामंत म्हणाले, अडीच वर्षात शिंदे यांनी मेहनत घेतली. सरकार आले. फडणवीस आमचे टीम लीडर आहे. त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. त्यामुळे या भेटीचा तसा काही संबंध नव्हता. राजकीय चर्चा आणि राजकीय घडामोडी घडवण्यासाठी आलो नव्हतो. पहिल्यांदाच राज्य सरकार अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. इथे कोणतीच राजकीय चर्चा नव्हती. झाली असेल तर आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांनाच चर्चा सांगणार ना. या भेटीकडे राजकीय पाहू नये. शरद पवार यांनी सरकारच्या कामाबद्दल विचारले. सत्कार झाल्यावर एकनाथ शिंदे किती वाजता मुंबईत पोहोचले याची विचारपूस त्यांनी केली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.