बीड : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसापासून संकटात असतांना पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहे. परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी दाखल केला होता. याप्रकरणी धनंजय मुंडेंना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.
धनंजय मुंडे यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्रे 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरूनच न्यायालयाने आदेश दिले असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे. कोर्टाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसवर 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.