नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने पुरवठा परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केल्यामुळे भाजी, अंडी आणि डाळींच्या किमती बर्याच कमी झाल्या आहेत. यामुळे जानेवारी महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी होऊन 4.31% इतके नोंदली गेली आहे. हा पाच महिन्याचा निचांक आहे.
डिसेंबर महिन्यात या महागाईचा दर 5.22% होता. तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये या महागाईचा दर 5.1% होता. म्हणजे वार्षिक आणि मासिक पातळीवर किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी झाली आहे. 2024 मध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 3.65% इतका होता. ऑक्टोबर महिन्यापासून किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी होत आहे.
महागाई कमी होण्याची शक्यता गृहीत धरून रिझर्व बँकेने गेल्या आठवड्यामध्ये आपल्या व्याजदरात पाव टक्के कपात केली आहे. केंद्र सरकारने रिझर्व बँकेला या महागाईचा दर चार टक्क्यांच्या आत रोखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता हा दर जवळपास या उद्दिष्टाच्या जवळ आला आहे. जर ही आकडेवारी अशी सकारात्मक राहिली तर एप्रिल किंवा जून मध्ये आणखी एक व्याजदर कपात होऊ शकते असे ईक्रा संस्थेच्या अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर अजूनही 6.02% इतका मोजला गेला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये हा दर 5.56% होता. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने म्हटले आहे की, अंडी, डाळी आणि भाजीपाल्यासह धान्य, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि औषधाच्या किमती कमी झाल्यामुळे एकूण महागाई कमी झाली आहे.