नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील ठाकरे व शिंदे गटाच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता विधानसभा 2014 निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांनी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप नाशिक महापालिकेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पैसे मागितले नाही. शिवसेनेने अनेक पद दिली, पण पैसे घेतले नाही. परंतु नीलम गोऱ्हे यांच्याकडून मी माझे पैसे परत घेतले, असेही विनायक पांडे यांनी म्हटले. पुण्यातील ठाकरे गटाचे गटनेते अशोक हरनावळ यांनीही नीलम गोऱ्हे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
मी शिवसेनेचा शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपमहापौर, महापौर होतो पण शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरे यांनी कधीही माझ्याकडून पदासाठी एक रुपयाही मागितलेला नाही. फक्त त्यांनी चांगले काम करतो, डॅशिंग कार्यकर्ता आहे एवढे पाहून मला सतत पदे देत गेले. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी भरभरून दिले. परंतु, विधानसभा निवडणुकीत तिकीटासाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते. या बाईंनी माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांकडून पैसे घेतले होते. महाराष्ट्रातील अनेक नेते ते सांगण्यासाठी पुढे येतील, असेही विनायक पांडे म्हणाले. पुण्यातील गटनेता अशोक हरनावळ यांच्याकडूनही अशाचप्रकारे पैसे वसूल केलेले आहेत, असेही विनायक पांडे म्हणाले.
नीलम गोऱ्हे यांनी जिथे विषय मांडला, ते विषय मांडण्याचे व्यासपीठ नव्हते. ते मराठी साहित्य संमेलन होते. तिथे मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही. खरोखर त्या बाईची आम्हाला किव येते. पैशांच्या व्यवहारापुढे ही बाई कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे सत्य आहे.
मी 43 वर्षांपासून शिवसेनेत काम करतोय. माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमी खुले आहेत. पण काही कार्यकर्ते नवीन असतात, त्यांना सत्तेची, पदाची अपेक्षा असते. ही बाई ज्या-ज्या ठिकाणी संपर्क नेता होती, तिथे ही बाई कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहचू द्यायची नाही, असा आरोप विनायक पांडे यांनी केला. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पैसे मागितले नाही. ठाकरेंकडे अशा गोष्टी घडत नाहीत. मातोश्री आमच्यासाठी पवित्र स्थान आहे. तिथे आमचे दैवत बसलेले आहे.
निलम गोऱ्हेंनी हे पैसे कोणाकडे दिले? माहित नाही असे विनायक पांडे म्हणाले. त्यांनी परत केले पैसे, म्हणजे त्यांच्याकडेच होते. उद्धव ठाकरेंना याची कल्पना आहे का? यावर इतके काही मला माहित नाही. हे नेते तिथपर्यंत पोहोचूच देत नसतील, तर उद्धव ठाकरेंना कसे समजणार? असे विनायक पांडे म्हणाले.