मुंबई : वृत्तसंस्था
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळते, असे त्यांनी विधान केले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, संवैधानिक पदावर असणाऱ्या नीलम ताई गोऱ्हे यांच्याबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे संजय राऊत बोलतात. ही महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणे त्यांना अश्लील शिव्या देणे हा संजय राऊतांचा इतिहास आहे. त्यांनी स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या अश्लील शिवीगाळची क्लीप आज ही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. अशा नाठाळ संजय राऊतांना आता महाराष्ट्रातील महिलांनीच वठणीवर आणले पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर संजय राऊत यांनी टीका केली होती. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर ‘निर्लज्ज, नमकहराम’ असे शब्द वापरत टीका केली होती. ज्या घरात तुम्ही खाल्ले, आमदार झालात त्या विरोधात आज बोलतात, असेही संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मला आठवत आहे बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली. काही लोकांच्या मर्जी खातीर त्या आल्या, गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. त्या बाईंचे कर्तृत्व काय? विधान परिषदेत हे जर समजून घ्यायचे असेल तर पुण्यात महानगरपालिकेत आमचे गटनेते होते अशोक हरनाळ त्यांची मुलाखत घ्या. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचा प्लानिंग डीपी सुरू होते तेव्हा कोणा कोणाच्या नावावर या बाईने कोट्यावधी रुपये गोळा केले? हे गटनेते अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सडीज प्रकरण काय आहे ते त्यांना कळेल.