पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. नराधम दत्तात्रय हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसला होता. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी 13 टीम तयार केल्या होत्या, तसेच गावात 100 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने कसून शोध घेतल्यानंतर तब्बल 48 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
दत्तात्रय गाडे हा एका कॅनॉलच्या खड्ड्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल दिवसभर ड्रोनच्या माध्यमातून शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र, रात्री 11:45 च्या सुमारास तो पाणी पिण्यासाठी एका घरात गेला. त्या घरातील महिलेने तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी आरोपीला चारही बाजूंनी घेरले. यानंतर मध्यरात्री 1:20 वाजता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असून, आज सकाळी 11 वाजता त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.