ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला सल्ला : म्हणाले थेट समाजमनावर परिणाम होतो !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेने ‘प्रतिकार’ न केल्याच्या मुद्यावर बोट ठेवणाऱ्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना संवेदनशीलतेने बोलण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकरणांत बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे. कारण, बोलताना चूक झाली तर त्याचा थेट समाजमनावर परिणाम होतो. त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी सर्वांनी संवेदनशीलतेने बोलावे असा माझा सल्ला आहे, असे ते म्हणालेत.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेली घटना स्ट्रगल किंवा फोर्सफुली घडलेली कृती नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 जण होते. पण तरुणीने प्रतिकार न केल्याने कुणालाही शंका आली नाही. परिणामी, आरोपीला गुन्हा करता आला, असे ते म्हणाले होते. त्यानंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही अशा घटना पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात घडत असतात असे विधान केले होते. या दोन्ही मंत्र्यांच्या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी याविषयी बोलताना आपल्या मंत्र्यांना सबुरीने व संवेदनशीलतेने बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, माझ्या मते मंत्री योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. ते केवळ घटना घडली ते ठिकाण वर्दळीचे होते, बसमध्ये आत नव्हती तर बाहेर होती, त्यानंतरही प्रतिकार न झाल्यामुळे अशी एखादी घटना घडल्याचे लोकांना समजले नाही असे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते.

योगेश कदम नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना सल्ला देईन की, अशा प्रकरणांत बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे. कारण, बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर परिणाम होतो. त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी संवेदनशीलतेने बोलावे असा माझा सल्ला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. तो लपून बसला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नोलॉजीचा वापर करून त्याला शोधून काढले. या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल. त्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी काही माहिती दिली. इतर माहिती या स्टेजला देणे योग्य नाही. पण नेमका घटनाक्रम काय आहे? हे तुम्हाला कळेल.

पत्रकारांनी यावेळी आरोपीने एकदा नव्हे तर तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, पहिली गोष्ट यावर आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. पहिल्यांदा या सर्व गोष्टी स्पष्ट होऊ द्या. त्यानंतर त्यावर भाष्य केले पाहिजे. सध्या पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. आज त्याला कोठडी मिळेल. त्यानंतर तपास सुरू होईल. काही टेक्निकल व न्यायवैद्यक डिटेल्स आमच्याकडे आलेत. त्या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर या प्रकरणी बोलणे योग्य होईल. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या कायद्यात योग्य ती दुरुस्ती करून पुन्हा आणण्याचेही सूतोवाच केले. तत्कालीन सरकारने शक्ती कायदा आणला होता. पण त्यानंतर केंद्र सरकारने न्याय संहिता आणली. त्यात या कायद्यातील बऱ्याचशा तरतुदी आहेत. पण त्यानंतरही सरकार या कायद्याचा आढावा घेऊन आवश्यकता असेल तर योग्य ती दुरुस्ती करून तो आणण्याचा प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!