रायगड : वृत्तसंस्था
राज्यभर सध्या पुणे श्र्हातील स्वारगेट एसटी स्टॅडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच रायगडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडच्या पेणमध्ये भाजप महिला आघाडी पदाधिकारीच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी तरुणाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस आणि रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्या वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. मनिष म्हात्रेने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाल करण्यात आला आहे. पेण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये खळबळ उडाली आहे.
वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष म्हात्रेने १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पेण पोलिसांनी मनिष म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार सप्टेंबर २०२४ पासून तो पीडित मुलीवर अत्याचार करत होता.
भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (१), ६४ (२) (एम) तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२, ४, ६, ८ (पोक्सो) नुसार मनिष म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि मनिष यांची स्नॅप चॅटवरून मे २०२४ मध्ये ओळख झाली होती. त्यावरच ते एकमेकांशी बोलू लागले. ऑगस्ट २०२४ मध्ये मनिषने पिडीत मुलीला लग्नाचे आमीष दाखवत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मनिष म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या कारवाईनंतर मनिष म्हात्रेची आई वंदना म्हात्रे यांना जिल्हा शांतता कमिटीवरून त्वरीत बडतर्फ करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे सध्या रायगडमध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आता वंदना म्हात्रेंविरोधात पक्षाकडून काय निर्णय घेतला जातोय ते महत्वाचे ठरेल.