अक्कलकोट बस स्थानक होतेय टकाटक; गाड्यांची स्थिती मात्र सुधारेना !
तीर्थक्षेत्र बसस्थानकाला नव्या गाड्यांची प्रतीक्षा
अक्कलकोट : मारुती बावडे
तब्बल २९ कोटी रुपये खर्च करून अक्कलकोट शहरामध्ये भव्य बस स्थानक उभारले जात आहे परंतु कालबाह्य झालेल्या बसेसची अवस्था पाहिली तर नक्कीच अक्कलकोटला नव्या बसेसची
नितांत गरज निर्माण झाली आहे आणि याची प्रतीक्षाच आता अक्कलकोटवासीयांना लागून राहिली आहे. मध्यंतरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सोलापूर दौरा झाला होता. एक तीर्थक्षेत्र म्हणून त्यांच्याकडून या अपेक्षा वाढल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या बस स्थानकाची अवस्था अतिशय दयनीय होती.अनेक यावर यावर टीका झाली.त्यानंतर दुरुस्त कधी होणार किंवा नवीन इमारत कधी होणार याची चर्चा सर्वदूर झाली. अतिशय धोकादायक अवस्थेत असलेल्या बसस्थांनकाला अखेर मुहूर्त मिळाला.यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विशेष लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने एक नव्हे दोन नव्हे तब्बल २९ कोटी रुपये मंजूर करून घेतले.आता या बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.लवकरच म्हणजे येत्या सहा महिन्यांमध्ये हे बसस्थानक टकाटक दिसेल.अक्कलकोटचे नूतन बसस्थानक हे तीन मजली आहे. दोन चाकी वाहन , रिक्षा आणि चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहन तळ आहे.अकरा मोठे व्यापारी गाळे आहेत.भक्तनिवास , आरक्षण कक्ष ,शिवनेरी, शिवशाही ,शिवाई अशा बसेससाठी स्वतंत्र प्रतीक्षालय ,वाहक चालक विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष,स्वतंत्र महिला वाहक विश्रांती कक्ष ,अत्याधुनिक स्वच्छतागृहे , सर्व सोयीने युक्त कॅन्टीन ,कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, बसेस साठी एकूण २२ फलाट असे वैशिष्ट्य नवीन बसस्थानकाची आहेत.
असे चित्र एकीकडे असले तरी अक्कलकोट बस स्थानकातील सध्या असलेल्या बसेसची अवस्था पाहिली तर नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.अक्कलकोट डेपोकडे सध्या ५० गाड्या चांगल्या आहेत त्यातही दहा ते पंधरा गाड्या या कालबाह्य झालेल्या आहेत,अशी माहिती आहे.त्यातही काही वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत.अक्कलकोट शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या,ग्रामीण भागात असलेली व्यवस्था याचा विचार करता अक्कलकोट तालुक्याला किमान ९० गाड्यांची गरज आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच ५ हजार नव्या गाड्यांची घोषणा केली आहे.काही आगारांना त्या गाड्या आल्या पण आहेत.सोलापूर जिल्ह्यात केवळ बार्शी तालुक्याला दहा गाड्या पोहोचल्या आहेत. अक्कलकोट आगाराचा मात्र यात अजूनही समावेश झालेला नाही. काही दिवसांपूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटला नवीन बसेस मिळावेत यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी केली आहे त्या मिळतील अशी अपेक्षा आहे. यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केल्याची माहिती आहे.
शिवशाही बसेस झाल्या खराब
अक्कलकोट आगाराकडे असलेल्या अनेक बसेस ह्या ज्या वेळी ग्रामीण भागाकडे धावतात त्यावेळी कधीही बंद पडतात.त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होतो.लांब पल्ल्याच्या शिवशाहीची अवस्था तर खूपच खराब आहे एकूण सात शिवशाही गाड्या आहेत बहुतांश बंद अवस्थेत आहेत शेवटपर्यंत पोचतात की नाही याची खात्री नसते.ती वाटेत कधी बंद पडते हेच कळत नाही.बऱ्याच वेळा एसी बंद राहतो त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करतात.
अक्कलकोट ते बोरीवलीसाठी पर्याय स्लीपर बस हवी
अक्कलकोट ते बोरिवली रात्री ७ वाजून ४५ मिनिटाला निघते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोचते.परत तिथून संध्याकाळी साडे सहा वाजता निघते आणि अक्कलकोटला दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजता पोचते. जर या गाडीत काही बिघाड झाला तर प्रवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे या दोन गाड्या व्यतिरिक्त पर्यायी स्लीपर बस हवी.
ही गाडी नॉन एसी पण स्लीपर आहे.
शिवाई इलेक्ट्रिक बस कधी ?
मध्यंतरी राज्य परिवहन महामंडळाने शिवाई इलेक्ट्रिक बस गाड्या सुरू केल्या. परंतु या गाड्या अक्कलकोटला पोहोचल्याच नाहीत. त्या फक्त सोलापूर, पंढरपूर ,पुणे यासारख्याच रूटला आहेत त्याचे कारण विचारले असता अक्कलकोटला इलेक्ट्रिक स्टेशनच नाही अशा प्रकारचे उत्तर मिळाले. अक्कलकोट सारख्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन बरोबरच इलेक्ट्रिक बस गाड्या सुद्धा पाहिजे.