ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप : पण फडणवीसांनी तपास यंत्रणांना रोखले !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दाम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेलाही या विषयाला फुलस्टॉप देण्याचे गुप्त आदेश दिलेत, असा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केला आहे. धनंजय मुंडे हे देशमुख हत्या प्रकरणात 302 चे आरोपी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

मनोज जरांगे पाटील सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सरकारकडे सगळ्या यंत्रणा आहेत. पण जे जनतेला कळते, ते सरकारला का कळत नाही. धनंजय मुंडे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडे यांचे कार्यालय चालवण्याचे काम 1 नंबरचा आरोपी करत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना खंडणी मिळाली आहे आणि त्यांना खूनाचा विषयही माहिती आहे. पण फडणवीस यांनी या विषयाला फुलस्टॉप दिल्याचे आता उघड होत आहे. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेला असे गुप्त आदेश दिलेत.

फडणवीस एवढ्या निर्घृणपणे हत्या घडवून आणणाऱ्या राजकीय गुंडाला वाचवत आहेत. धनंजय मुंडे हा विषारी साप आहे. हा साप तुमच्यापुढे उभा राहणार आहे. असे होईल तेव्हा तुम्हाला आपल्या कपाळावर पश्चातापाचा हात मारून घ्यावा लागेल. प्रस्तुत प्रकरणातील 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करत होता. त्यांच्या सरकारी बंगल्यावर तशा बैठका झाल्या आहेत. पहिली बैठक त्यांच्या कार्यालयावर झाली. फरार आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केले. खंडणी मागितल्यानंतर व खून झाल्यानंतरही ही फोनाफोनी झाली. पहिली आरोपी फोन उचलत नव्हता म्हणून या आरोपींना धनंजय मुंडे यांच्याच कानावर फोन करून सर्वकाही घातले आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे 302 कलमांतर्गत धनंजय मुंडे यांना सहआरोपी करायला हवे.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात खंडणीची पहिली बैठक झाली होती. त्यात खंडणी मागायला जा आणि ऐकले नाही तर खून करा असे ठरले होते. दुसरी बैठक एका हॉटेलमध्ये झाली आणि त्यानंतर खून झाला. पहिल्य्ंदा धनंजय मुंडेंवर 120 (ब) लागला पाहिजे. पण फडणवीसांनी तपास यंत्रणांना रोखले आहे. त्यामुळे तपास यंत्रणा हतबल झाली आहे. फडणवीसांनी गुंडाना अभय देऊ नये. बनवाबनवी करू नये. सर्व पुरावे असूनही त्यांनी मुंडेंना वाचवू नये. मनोज जरांगे यांनी यावेळी चटके देण्यात आलेल्या बांधवालाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणी चटके देण्यासाठी जेवढे लोक होते, त्या सर्वांना आरोपी केले पाहिजे. पोलिसांनी हे लक्षात घ्यावे. या प्रकरणी कुणीही सुटता कामा नये. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी कोणताही भेदभाव न करता सर्वांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा तो ही एक दिवस चौकशीत सापडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!