मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणी आरोप प्रत्यारोप होत असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यास कारवाई करू असे जाहीर केले होते. मात्र, दमानियांच्या मते, या प्रकरणातील सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. त्यांनी दावा केला की, बालाजी तांदळे, शिवलिंग बोराडे, सारंग आंधळे यांना संदेश पाठवण्याचे काम धनंजय मुंडेंच्या मोबाईलवरून झाले. तसेच, मुंडेंकडे तीन मोबाईल फोन असून, ते सतत संपर्कात होते.
या पुढे दमानियांनी असा आरोप केला की, मुंडेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करत पोलिसांवर दबाव टाकून आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले. बालाजी तांदळे पोलिसांसोबत आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात हे प्रकरण योग्य दिशेने तपासले गेले नाही. त्यांनी मागणी केली की, या प्रकरणात सहाय्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावे. विशेषतः एलसीबीचे अधिकारी आणि इतर पोलिसांची नावे चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत, हे गंभीर प्रकरण आहे.
या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि धनंजय मुंडेंसह इतर आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, उज्ज्वल निकम यांना यासंदर्भात माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.दरम्यान, कांदिवली, गोरेगाव आणि मालाडमध्ये लालसिंग राजपूत नावाच्या व्यक्तीच्या टोळीने घर, कार्यालये आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार सुरू केल्याचा दमानियांनी आरोप केला आहे. त्यांनी या गुन्हेगारी कारवायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे