मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील शिवरायांच्या पहिल्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीसांनी या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली. राज्यात मोगल बादशहा औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केली. ASI ने 50 वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारलाही तिला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. पण महाराष्ट्रात औरंगबेजाबाच्या कबरीचे केव्हाही उदात्तीकरण होणार नाही. येथे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण होईल, असे ते म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना यूनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगमेश्वर येथे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली, तो संगमेश्वरचा वाडाही सरकार विकासासाठी घेणार आहे. सरकार तिथे स्मारक बांधेल. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात ज्या ठिकाणी औरंगजेबाने कैद केले होते, ती जागाही स्मारक विकसित करण्यासाठी देण्यात यावी यासाठी सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे. यासंबंधी अर्थसंकल्पातही योग्य ती तरतूद केली आहे.
पानीपतच्या युद्धात मराठ्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्यानंतर 10 वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर आपला झेंडा रोवला होता. त्यामुळे सरकार पानीपत येथेही स्मारक बांधणार आहे. तूर्त सरकार शिवाजी महाराजांच्या या मंदिराला तत्काळ तीर्थस्थळाचा दर्जा देईल.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवरायांचे मंदिर व औरंगजेबाच्या कबरीवरील आपली भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ शिवरायांचेच महिमामंडन होईल. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला ASI ने 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. पण या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे केव्हाच महिमामंडन होणार नाही.