अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र या गर्दीची अचूक माहिती आणि रोज येणाऱ्या भाविकांची नेमकी संख्या किती हा आकडा कळण्यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेने भाविकांची डिजिटल यंत्राद्वारे गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रोज येणाऱ्या भाविकांची नेमकी संख्या प्रशासनाला समजणार आहे.याची माहिती वरिष्ठ पातळीवर सरकार आणि प्रशासनाला सुद्धा देण्यात येणार आहे.जेणेकरून गर्दीच्या
मानाने अक्कलकोटमध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्यास मदत होणार आहे.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी आणि संख्या ही अंदाजित ठरविली जाते.पण हा संभ्रम कमी होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी संचार’शी’ बोलताना सांगितले.ही गणना सीसीटीव्ही व डिजीटल यंत्रणेच्या माध्यमातून होणार आहे.यासाठी नुकतीच या प्रक्रीयेची निविदा देखील काढण्यात आलेली आहे. सध्या नगरपरिषदेवर प्रशासकराज आहे. तरीही या काळात बरीच विकासाची कामे मार्गी लागत आहेत.आमदार सचिन कल्याणशेट्टी हे देखील तीर्थ क्षेत्र विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तीर्थक्षेत्र विकास व विविध योजनेच्या माध्यमातून विकास निधीचा ओघ कायम आहे.
मुख्यतः भाविक सण, वार, उत्सवाच्या काळात अक्कलकोटला अधिक येत आहेत. अशावेळी सुविधा देणे अडचणीचे होत आहे यात भाविकांना सुविधा देता याव्या तसेच निधी मोठ्या प्रमाणात मिळावा यासाठीच येणाऱ्या भाविकांची गणना करण्याची नगरपरिषदेने ठरविले आहे. या अगोदर भाविकांची संख्या अंदाजे सांगितली जायची मात्र आता अचूक गणना होण्यासाठी डिजीटल यंत्राचा वापर होणार आहे. या निर्णयाचे स्वामी भक्तातून देखील स्वागत केले जात आहे.
लवकरच कामास प्रारंभ
राज्यातील टॉप फाईव्हमध्ये असलेले तीर्थक्षेत्र अक्कलकोट हे आता विकास कामाच्या माध्यमातून कात टाकत आहे. असे असताना तरंगत्या लोकसंख्येचा अभ्यास होणे देखील गरजेचे आहे.याबाबतची निविदा काढण्यात आली असून लवकरच कामास प्रारंभ करण्यात येणार आहे.
रमाकांत डाके, मुख्याधिकारी





