ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले : २०२९ मध्ये PM म्हणून लोक मोदींकडेच पाहतात !

मुंबई : वृत्तसंस्था

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर निशाणा साधत ते आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानमुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे विरोधकांना ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्तातच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वडील जिवंत असताना मुलांनी असा विचार करावा ही भारतीय नव्हे तर मुघलांची संस्कृती आहे, असे ते म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजी आमचे नेते आहेत. ते अजून बरेच वर्षे काम करणार आहेत. त्यांच्याकडे आमच्या सर्वांचा आग्रह आहे. आमच्यासह संपूर्ण देश त्यांच्याकडे 2029 चे पंतप्रधान म्हणून पाहतो. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. तो विचार करायचाही नसतो. वडील जिवंत असताना मुले असा विचार करतात ही मुघलांची संस्कृती आहे. त्यामुळे आत्ता कुणाचाही व कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही किंवा तसा प्रश्नही उपस्थित होत नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असल्यामुळे ती अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. सदर कबर एएसआय संरक्षित आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्न नाही. या कबरीला कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी संरक्षण मिळाले आहे. त्यामु्ळे या प्रकरणी कायद्याने तिचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. पण हे मात्र निश्चित आहे की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही औरंगजेबाच्या कबरीने ग्लोरिफिकेशन अर्थात उदात्तीकरण होऊ देणार नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!