ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महागाई, पेट्रोल दरवाढीवर खा.शिंदेंनी साधला भाजपवर निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था

गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे 84 वे अधिवेशन होत आहे. यात पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक चार तास चालली. आज, दुसऱ्या दिवशी, मुख्य अधिवेशन साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत आहे, ज्यामध्ये देशभरातील 1700 हून अधिक काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यात महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे. या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले काँग्रेस आमदार नाना पटोले आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे हे अधिवेशन 64 वर्षांनी गुजरातमध्ये होत आहे. या वर्षी महात्मा गांधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून 100 वर्षे पूर्ण करत आहेत. याशिवाय, सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती देखील आहे. दोन्ही महापुरुषांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता, म्हणूनच काँग्रेस पक्ष हे अधिवेशन गुजरातमध्ये आयोजित करत आहे. यापूर्वी 1961 मध्ये भावनगर येथे अधिवेशन झाले होते. स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसचा हा पहिला कार्यक्रम होता. त्यानंतर आमा हे अधिवेशन होत आहे.

26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात प्रत्यार्पित करण्यात येणार आहे. या बाबत काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, “अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत त्याला येथे आणले जात नाही तोपर्यंत आपण कशावर विश्वास ठेवू शकतो? वास्तविक नरेंद्र मोदी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात परत आणणार अशी घोषणा केली होती. त्याचे काय झाले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस पक्षाचे कोणतेही राजकीय नुकसान झाल्यास त्यावर CWC बैठकीत चर्चा केली जाते. कमतरता दूर करण्यासाठी निर्णय घेतले जातात. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. तिथे (भाजपमध्ये) लोकशाही नाही, मोदी आणि अमित शहा जे काही बोलतात तो भाजपचा निर्णय असतो, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

लोकसभा खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सत्तेत आल्यापासून भाजपचा अजेंडा ध्रुवीकरणाचा आहे. महाराष्ट्रात ते 300 वर्षे जुने मुद्दे उपस्थित करत आहेत. महागाई, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती, मणिपूर, बेरोजगारी किंवा शेतकऱ्यांबद्दल कोणीही बोलत नाही. एक प्रकारे, भाजप देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहे आणि विष पसरवत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!