---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तरुणांना महत्वाचा सल्ला !

By team
On: April 14, 2025 4:57 PM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे नेहमीच आपल्या भाषणाने चर्चेत येत असतांना सर्वांनी पाहिले आहे. आता अजित पवारांनी तरुणांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांनो, पुस्तके ही तुमचे खरे मित्र असून, ती विचार करायला शिकवतात. कल्पनाशक्तीला पंख देण्यासोबत नवीन जगाला जोडण्याचे काम करीत असतात. पुस्तकांमुळे व्यवहारिक ज्ञान वाढण्यासोबतच नवीन संधीचे दरवाजे उघडण्याचे कामदेखील होते. त्यामुळे अधिकाधिक पुस्तके वाचा आणि त्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवा, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.

पंचायत समिती सभागृहात आरोग्य विभाग व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना चष्मे आणि पुस्तकवाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राजीव मेहता, डॉ. संतोष भोसले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पालकांचा पाठिंबा, विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती आणि शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे यशाचे शिखर गाठण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तींवर विश्वास दाखवून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनीही ध्येय गाठण्याकरिता प्रचंड मेहनत आणि स्वतःला समर्पित केले पाहिजे. शिक्षकांनी काळानुरूप अद्ययावत ज्ञान देत मुलांचे भविष्य उज्ज्वल केले पाहिजे. यामाध्यमातून भारत देश महासत्ता होण्याकरीता उद्याची सक्षम पिढी घडविण्याचे काम करावे, असेही ते म्हणाले.

समाजातील गरजू व्यक्ती लाभापासून आर्थिक बाबीमुळे वंचित राहू नये, यासाठी संस्थेची मदत घेत आहोत. तालुक्यातील आरोग्य विभागामार्फत 30 हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली, यामधून 1 हजार 512 विद्यार्थ्यांना दृष्टिदोष आढळून आला. त्या सर्व विद्यार्थ्यांना रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उच्च प्रतीचे चष्मेवाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता जिल्हा परिषद व शासकीय अनुदानित शाळांना 50 हजार पुस्तके देण्यात येणार आहेत. दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, अशांना या चष्म्यामुळे सुलभ पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. चष्मे आणि पुस्तकांकडे साधने म्हणून न बघता यशाची पहिली पायरी म्हणून पाहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी केले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!